स्वा० सावरकर आणि ’महापौर’चा जन्म (दै० सामना दि० २२ ऑक्टोबर २०१०)

पत्र मिळताच पुण्याचे मेयर गणपतराव नलावडे आपल्या कार्यालयाबाहेर धावले. त्यांनी शिपायाला ’मेयर ऑफ पुणे’ ची पाटी काढायला लावली. लगोलग ’महापौर’ची पाटी तयार झाली. तेव्हापासून हा शब्द सहज रुळला.

आपले मित्र श्री० प्रसाद परांजपे यांनी २२ ऑक्टोबरच्या दैनिक सामनाच्या अंकातील हे वाचकाचे पत्र पाठवले आहे.

————-

१९३८ मध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना स्वा. सावरकरांनी भाषाशुद्धीबद्दल आग्रही मत मांडले. आज त्यांनीच रुढ केलेले दूरध्वनी, महापौर, दिनांक, संकलन, चित्रपट आदी अनेक शब्द आपण सर्रास वापरतो. पण त्याचे निर्माते सावरकर आहेत हे आपण विसरलो.

सावरकरांना मानणारे गणपतराव नलावडे पुणे शहराचे ’मेयर’ झाले ही वार्ता कळल्यावर दोन दिवसांनी सावरकरांकडून अभिनंदनाचे पत्र त्यांच्याकडे आले. त्यात म्हटले होते, – “पत्र पाठवण्यास विलंब होत आहे, क्षमस्व.’मेयर’ या शब्दाला प्रतिशब्द काय असावा याचा विचार करत होतो. तो शब्द मिळाला. ’महापौर’ हा शब्द मिळाला. ’महापौर’ हा शब्द अधिक योग्य वाटतो.”

पत्र मिळताच पुण्याचे मेयर गणपतराव नलावडे आपल्या कार्यालयाबाहेर धावले. त्यांनी शिपायाला ’मेयर ऑफ पुणे’ ची पाटी काढायला लावली. लगोलग ’महापौर’ची पाटी तयार झाली. तेव्हापासून हा शब्द सहज रुळला.

मिलिंद मोकाशी. बदलापूर.

————–

.

7 thoughts on “स्वा० सावरकर आणि ’महापौर’चा जन्म (दै० सामना दि० २२ ऑक्टोबर २०१०)

  1. It is a pity that while giving my reaction on this subject of appropriate Marathi words for English ones, I do not know how to use the Marathi font of gmail. Plesse pardon me for writing in English here.
    No doubt we must have Marathi synonyms for all English words so that even scientific knowledge can be brought in our language. But we must be a little liberal about this and take some common English words as they are in our language. For example Railway for which the word ‘Agnirath’ seems archaic and funny.
    It is a very big task nevertheless.
    Yeshwant Karnik.

    • प्रिय श्री० यशवंत कर्णिक यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले म्हणणे योग्यच आहे. मातृभाषा हे शिक्षणाचे सर्वोत्तम माध्यम आहे असे महात्मा गांधी व गुरूदेव टागोरच नव्हे तर जगातील सर्वच शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ, तसेच अगदी युनेस्कोसारख्या संस्थाही नेहमीच म्हणत आल्या आहेत. गणित विषयातील बहुतेक शोध इंग्रजीतर विद्वानांनी लावले. पण त्याचा अभ्यास इंग्रज आपल्या स्वतःच्या भाषेतच करतात. थोर इंग्रज शास्त्रज्ञ न्यूटन ह्याने स्वतःचे सर्व संशोधन तत्कालीन समाजाच्या इंग्रजीबद्दलच्या न्यूनगंडामुळे लॅटिनमध्येच लिहिलेले आहे. पण त्याचा अभ्यास इंग्रज इंग्रजीतून तर रशियन, जपानी, कोरियन, इस्रायली लोक आपापल्या भाषेतूनच करतात. आपली शिक्षणव्यवस्ता, शासनव्यवस्था, न्यायव्यवस्था, पोलिस, संसदव्यवस्था अशा लोकशाहीमध्ये महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या सर्वच क्षेत्रात देशातील ८-१० टक्के लोकांनाही अवगत नसणार्‍या परकीय भाषेला अवाजवी महत्त्व देणारा देश भारतीय उपखंडाच्या बाहेर आम्हाला तरी आढळलेला नाही.

      आपलेच विचार पुढे नेऊन मला असे म्हणावेसे वाटते की –

      आज आपण जर एखादे मराठी वर्तमानपत्र उघडून पाहिले तर पहिल्या पानावर देखील किमान ५०-१०० असे शब्द आढळतील की जे शब्द व त्यांमागील संकल्पना पाऊणशे-शंभर वर्षांपूर्वी मराठीला माहितच नव्हत्या. सावरकरच नव्हे तर इतरही अनेक विद्वानांनी, भाषाशास्त्रींनी, साहित्यिकांनी हिरीरीने नवनवीन उत्तमोत्तम शब्द शोधून काढले व ते भाषेत प्रस्थापित झाले. त्यांनी असे केलेच नसते तर आज मराठी वर्तमानपत्र हे आंग्लसंस्कृतिविभूषित पल्लवी जोशी हिच्याच भाषेत देवनागरीमध्ये लिहिल्याप्रमाणे परकीय भाषेने भरलेले दिसले असते.

      अतिरेकाबद्दल म्हणाल तर ती लक्ष्मणरेषा कुठे आखायची याबद्दल प्रत्येकाचे मत वेगळे असते. तसे आपण बस, टेबल इत्यादी शब्द स्वीकारलेले आहेतच. पण अनावश्यक शब्द स्वीकारू नये असे आम्हाला वाटते. पल्लवी जोशीसारख्या मराठी बोलताना वाक्यातील दहापैकी आठ इंग्रजी भाषेतील शब्द वापरणार्‍यांना सावरकरांचे महापौर, हुतात्मा आदी शब्द archaic (जुनाट) व funny (गमतीदार, विचित्र, खुळचट?) वाटतात व त्यांची ते कुचेष्टाच करतात. महात्मा गांधींनी इंग्रजी भाषेच्या खुळाबद्दल म्हटल्याप्रमाणे “The cancer has so eaten into the society that in many cases the only meaning of education is Knowledge of English. All these are for me, signs of our slavery and degradation. It is unbearable to me that the vernaculars should be crushed and starved as they have been. “. (वाचा लेख: http://wp.me/pzBjo-w8 ). पण आपण आज लॉर्ड मेकॉलेचे पाईक बनलो आहोत, ज्याला भारतीयांना असे बनवायचे होते, “a class of persons, Indian in blood and colour, but English in taste, in opinions, in morals, and in intellect. ” आणि बर्‍याच प्रमाणात तो यशस्वी झाला असेच आज म्हणावे लागेल. (वाचा लेख: http://wp.me/pzBjo-uH)

      शब्दांचा एक गुणधर्म मित्राप्रमाणे आहे. एखादा शब्द नवीन असताना विचित्र, परका वाटतही असेल. पण नित्यवापराने तो ओळखीचा, आपलासा, जवळचा वाटू लागतो. आपण इंग्रजी शब्दच ऐकत राहतो आणि मग मराठी शब्द कधीतरी ऐकला की तो परका, बोजड, विचित्र वाटतो. उदा० आम्हा इंग्रजीप्रचूर भाषा ऐकण्याची सवय असणार्‍या शहरी मंडळींना ’डिस्ट्रिब्यूशन’ हा शब्द ’वितरण’, वाटप’ ह्या शब्दांपेक्षा हलकाफुलका, सोपा, जवळचा (?) वाटतो. त्याचप्रमाणे ट्रकिया, ईसोफेगस, एक्झिक्यूशन, गायनॅकॉलॉजिस्ट, पॉस्च्यूमस, डायाबीटिस, असे शब्द श्वासनलिका, अन्ननलिका, कार्यवाही, स्त्रीरोगतज्ज्ञ, मरणोत्तर, मधुमेह ह्यांच्यापेक्षा अधिक चांगले वाटतात, नाही का? ते खरोखरच अर्थवाही आहेत का? हलकेफुलके आहेत का? (स्पेलिंगचा चक्रव्यूह तर बाजूलाच ठेवू.) शेवटी ऐकून ऐकूनच ते जिवलग होतात व अंगवळणी (कानवळणी) पडतात व त्यामुळेच ही सर्व मानसिकता बनते.
      मध्यंतरी राईलकर सरांच्या एका लेखात वाचल्याप्रमाणे जपानी भाषेतही इंग्रजी शब्दांना धडाधड प्रतिशब्द निर्माण करतात व वापरू लागतात. प्लॅटफॉर्मला ते म्हणतात – चढ-उतार-स्थान. त्यांनी शब्द असे सोपे केले आहेत की सामान्य माणसांना सहज कळावेत.

      पूर्वी अनेक वर्षे रेल्वे’ला आगगाडी हा शब्द आम्ही सर्रास वापरत होतो. तेव्हा तो कधीच खुळचट वाटला नाही. बालपणापासून अग्निरथ हा शब्द ऐकला तर तोही योग्य वाटला असता. एक उदाहरण सांगतो. लहानपणी आम्ही omlette ला ’अंड्याचा पोळा’ किंवा ’आमलेट’ असे म्हणत असू. जरा मोठे झाल्यावर मूळ इंग्रजी शब्द ऑमलेट असा आहे हे समजले तेव्हा तो शब्द कसातरीच वाटला. ऑमलेट’पेक्षा आमलेट हाच शब्द बरा आहे असेही वाटले. नेहमी नळाला णळ म्हणणार्‍याला तोच शब्द योग्य वाटतो. नळ हा शब्द जेवढा शुद्ध मराठी आहे असे आपल्याला वाटते तेवढाच णळ हा शब्द शुद्ध आहे असे त्याला वाटते. त्याला अयोग्य असे आपण म्हणूच शकत नाही. कारण त्यात वैश्विक सत्य वगैरे काहीच नाही, साधा सवयीचा, सरावाचा प्रश्न आहे. भारतातील माणसाला डाव्या बाजूने गाडी चालवण्याची सवय असते. तो अमेरिकेत गेल्यावर त्याला काही दिवस विचित्र वाटणारच. अशा अनेक गोष्टी प्रथम त्याला खटकतात. नंतर काही वर्षे (किंवा जेमतेम काही महिनेदेखील) अमेरिकेत वास्तव्य झाल्यावर तोच भारतीय माणूस “आमच्या अमेरिकेत यू नो, वुई ड्राईव्ह ऑन दी राईट साईड ऍण्ड हेन्स मी इंडियात आल्यावर आय गेट ऍब्सोल्यूटली कनफाऊंडेड बिकॉज ऑफ दी फनी सिस्टिम हियर इन दिस कण्ट्री” असे म्हणायला कमी करत नाही.

      म्हणूनच स्वभाषेतील शब्द जुनाट व विचित्र वाटण्यामागे ’सवय नसणे’ हेच एकमेव कारण आहे असे आम्हाला वाटते. अर्थात हे मत भारतातील बर्‍याच मंडळींना पटणार नाही ह्याची आम्हाला कल्पना आहे व ते मतांतर आम्ही नक्कीच मान्य करतो.

      मराठीत प्रतिक्रिया लिहिण्यासाठी आपण खालील लेख वाचून पाहू शकता. किंवा पत्र प्रथम जी-मेल मध्ये लिहून मग ते इथे घालू शकता.

      संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल –} http://wp.me/pzBjo-2d

      आपल्याला, आपल्या कुटुंबियांना व मित्रबांधवांना ही दिवाळी व येते वर्ष सुखाचे, आनंदाचे व समृद्धीचे जावो अशी अमृतमंथन परिवाराच्या वतीने शुभेच्छा.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय डॉ० विजय आजगावकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले म्हणणे अगदी पूर्णपणे पटते.

      स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात तसेच स्वातंत्र्यानंतरच्या पाव शतकात, जेव्हा स्वातंत्र्य लढ्यामुळे लोकांच्या मनात स्वदेशप्रेमाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या स्वसंस्कृती आणि स्वभाषेबद्दलचे प्रेम व अभिमान अजुनही शाबूत होते; तेव्हा मराठीमधील पंडित साहित्यिकांनी पूर्णपणे नवीन असलेल्या इंग्रजी संकल्पनांसाठी देखील उत्तमोत्तम शब्द शोधून काढून मराठीत रुळवले आणि प्रस्थापित केले. आज व्यवस्थितपणे रूढ झालेले अनेक शब्द लोकांना सुरूवातीला खटकले होते. त्याबद्दल काही मंडळींनी सावरकरांची टिंगलही केली होती. पण सावरकरांनी आपली भाषणे, लेख, नाटके, कविता यांच्याद्वारे हिरीरीने ते लोकांना ऐकवले आणि त्यापैकी अनेक शब्द लोकांच्या नकळत आपल्या मराठी भाषेचा अविभाज्य भाग बनले. अर्थात थोडेफार दुर्लक्षितही राहिले. सावरकरांनी घडवलेले किंवा रूढ केलेले काही उत्तमोत्तम शब्द पहा. – शाळा, प्रशाला, महाविद्यालय, प्राचार्य, प्राध्यापक, दिनांक, लोकसंख्या, उत्तरदायित्व, कृपया, अंगणवाडी, पक्षकार, अभ्यासक्रम, चळवळ, आंदोलन, स्थायी समिती, आयुक्त, संयुक्तराष्ट्रसंघ, सहनिवास (सोसायटी), पुरस्कार (अवॉर्ड), परिशिष्ट (अपेण्डिक्स), प्रबोधिनी (अकॅड्‌मी, अकादमी), केशकर्तनालय (हेअर कटिंग सलून), औषधालय (केमिस्ट), पीस (संधी), सेना-सैन्य (आर्मी), शिबीर (कॅंप), युद्धनौका (वॉरशिप), पाणबुडी (सबमरीन), अंश (डिग्री), टपाल (पोस्ट), दूरध्वनी, दूरदर्शन, वायुदल, पायदळ, नौदल, टंक, परिपत्रक (सर्क्युलर), ध्वनिक्षेपक (लाउडस्पीकर), इतिवृत्त (रिपोर्ट), संसदपटु (पार्लमेंटेरियन), विधी (लॉ), विधिमंडळ (लेजिस्लेचर), अर्थसंकल्प, विभाग (डिपार्टमेंट), राजस्व (रेव्हिन्यू), कार्यवाही (एक्झिक्यूशन), चित्रपट, मध्यंतर, चित्रण (शूटिंग), त्रिमिती (थ्री-डायमेन्शन), नेपथ्य (ग्रीन रूम), वेशभूषा (ड्रेसिंग), वेशकक्षा (ड्रेसिंगरूम), छायाचित्र, व्यक्तिचित्र (पोर्ट्रेट), दृश्य-देखावे (सीन-सीनरी), रंगभूमी-रंगमंच-मंच-व्यासपीठ (स्टेज), आरोग्यालय (सॅनिटोरियम), रुग्णालय (हॉस्पिटल), सीमा-पराकाष्ठा-मर्यादा (लिमिट), इत्यादी (एट्सेट्रा) इत्यादी. यातील अनेक उत्तमोत्तम शब्द अगोदर मराठीत निर्माण झाले व मग इतर भारतीय भाषांमध्येही स्वीकारले जाऊन आज तिथे देखिल व्यवस्थित प्रस्थापित झाले आहेत. ह्याचे श्रेय अनेक मराठी भाषिक विद्वानांना जाते. डॉ० रघुवीरांनी देखील अतिशय परिश्रमपूर्वक तयार केलेल्या आपल्या आंग्लभारतीय महाकोशाच्या रूपानेही सर्वच भारतीय भाषांच्या एकात्मिक उन्नतीच्या दृष्टीने महाप्रचंड काम केलेले आहे.

      नीट विचार केला तर – इत्यादी, स्वतः, तथाकथित, रंगभूमी, बलात्कार, सार्वजनिक, लोकसभा, असे अनेक (आज साधे वाटणारे) शब्द, जे आपण आज सहजपणे वापरतो, ते सुद्धा मराठीत प्रचलित नव्हते हे लक्षात येते. वरीलप्रमाणे विविध नवीन संकल्पनांना प्रतिशब्द योजणे मराठीतील विविध विद्वानांनी केलेच नसते व आपण स्वभाषेबद्दलच्या औदासिन्यामुळे किंवा परभाषेबद्दलच्या वृथा बडिवारामुळे मराठीत हिंदी व इंग्रजी शब्दांचे अनिर्बंध रोपण चालूच ठेवले असते तर आज मराठीत नव्वद टक्क्यांहून अधिक परकीय शब्द आले असते.  मग तशा भाषेला मराठी म्हणावे की एक इंग्रजी-हिंदीची बोलीभाषा?

      आपण खालील लेख वाचला का? त्या काळी इंग्रजांना स्वभाषेबद्दल अतिशय न्यूनगंड होता. “इंग्रजीत वैद्यकीय शिक्षण दिल्यास रोगी मरतील”, “इंग्रजी भाषा ही केवळ रस्त्यावर मारामारी करणार्‍य़ांना भांडणासाठी उपयोगी पडेल न्यायालयात वाद घालणार्‍या वकिलांना नव्हे.” अशी त्याकाळी इंग्रजांची स्वभाषेबद्दलची मते होती. आम्हा इंग्रजीधार्जिण्या भारतीयांचा सहजासहजी विश्वास बसेल का आज यावर?

      https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/

      आपल्याला, आपल्या कुटुंबियांना व मित्रबांधवांना ही दिवाळी व येते वर्ष सुखाचे, आनंदाचे व समृद्धीचे जावो अशी अमृतमंथन परिवाराच्या वतीने शुभेच्छा.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  2. नमस्कार!
    आपण जी सावरकरांनी व इतरांनी प्रचलित केलेल्या शव्दांची यादी दिलेली आहे, ती मराठी भाषेतून हद्दपार करण्याचा विडाच तथाकथित मराठी वृत्तवाहिन्यांनी उचललेला दिसतो. सध्या ‘शहीद’ यांचे फावले आहे आणि हुतात्मा सर्व हद्दपार केले गेलेले आहेत. पुण्यातील हुतात्मा वावू गेनू चौकाचे नामांतर शहीद बाबू गेनू चौक कधी होणार असाच प्रश्न आता विचारला गेला पाहिजे.

    या मराठी वाहिन्यांची मालकी देखील मराठी माणसांकडे नाही आहे. असो, तो एक स्वतंत्र लेखाचाच मुद्दा होउ शकेल. (युनीकोड मध्ये हे लिहिताना आजदिवशी आपण मराठीतला लसणातला ल वा शेंडीफोड्या श सुद्धा लिहू शकत नाही.)

    दिवाळी तुम्हां-आम्हां सर्वांचे आयुष्य ज्ञानाच्या उजेडाने उजळून टाको ही सदिच्छा !

    • प्रिय श्री० हिंदूराव मराठे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या पूर्ण नावावरूनही (हिंदू आणि मराठा) आपण स्वा० सावरकरांचे भक्त असावेत असा कयास बांधावासा वाटतो.

      आपल्या स्वाभिमानी आशयाच्या पत्राबद्दल आभार. आपले वाक्यन्‌ वाक्य पटले. मात्र आम्ही पुढे असेही म्हणू इच्छितो की इतर राज्यांतील वाहिन्या देखील इतर उद्योगधंद्यांप्रमाणे परप्रांतीयांच्या हातात असतात. पण तरीही तिथे स्थानिक भाषा व संस्कृतीला कोणीही गौण ठरवू शकत नाही.

      आपल्याकडे टाईम्स ऑफ इंडियाने म०टा०द्वारा जी व्यावसायिक टॅब्लॉईड संस्कृती आणली ती पुढे लोकसत्ताच नव्हे तर पुण्यातील सकाळ सारख्या व इतर ठिकाणच्या पुढारी’सारख्या वर्तमानपत्रांमध्येही पसरली. आज अधिकाधिक हिंदी व इंग्रजी मिश्रित भाषा (योग्य मराठी शब्द उपलब्ध असतानादेखील) लिहिण्यातच अहमहमिका लागलेली असते.

      या बाबतीत एक गोष्ट सांगतो. काही वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या स्वभाषेवरील अत्याचारांमुळेच चेन्नईमधील दुखावलेले स्वाभिमानी व कडवे तमिळ प्रेक्षक नवीनच सुरू केलेल्या तमिळ भाषेतील स्टार वाहिनीविरुद्ध चवताळून उठले आणि त्यांनी स्वयंस्फूर्तीने तीव्र आंदोलन केले. “अशा प्रकारे आमच्या भाषेचा अपमान केल्यास आपल्या वाहिनीवर जाहिराती देणार्‍या सर्व उत्पादनांवर आम्ही बहिष्कार टाकू” अशी त्यांची धमकी ऐकताच त्या स्टार वाहिनीवाल्यांच्या डोळ्यांसमोर ’तारे’ चमकले व त्यांनी तमिळवरील भाषिक अत्याचार बंद केले. पण निर्भावनिक आणि स्थितप्रज्ञ मराठी माणसाचा स्वभाषाभिमान डिवचला जाऊन तो कधीतरी स्वयंस्फूर्तीने अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करेल काय?
      —————
      ४५-५० वर्षांपूर्वी सर्व राज्यांनी टंकलेखनासाठी व मुद्रणासाठी आपापल्या भाषेतील वर्णांप्रमाणे टंक बनवून घेतले. पण महाराष्ट्र शासनाने तसे काहीही प्रयत्न न करता हिंदीचे वर्णच आयते वापरण्यासाठी श व ल हे हिंदी प्रमाणे बदलले. १९७५ वर्षानंतर १०+२+३ पद्धतीखाली शालांत परीक्षा दिलेल्या मुलांच्या शालेय पुस्तकांमध्ये तेच वर्ण वापरणे सुरू केले. मग सर्वकडे त्याचाच प्रसार झाला. आता महाराष्ट्र शासनाला उशीरा का होईना पण जाग आली आहे व आपणच अविचारीपणाने केलेला गाढवपणा सुधारण्यासाठी आता शेंडीफोड्या श व लसणातील ल हेच वर्ण आता पुन्हा प्रमाण म्हणून घोषित केले गेले आहेत. खालील लेख वाचावा.

      मराठी देवनागरी वर्णमालेत सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल शासनाचे अभिनंदन ! (वृत्त: प्रेषक सुशांत देवळेकर) –} http://wp.me/pzBjo-bQ

      ————-
      आपल्यासारख्या मराठीप्रेमींनी सतत जागृत राहून यथाशक्ती, यथाशक्य मराठी माणसाचा स्वाभिमान पुन्हा जागृत करण्याचे प्रयत्न करीत राहिले पाहिजे.

      आपण खालील लेख वाचले आहेत काय? नसल्यास सवडीने अवश्य वाचून पहा.

      https://amrutmanthan.wordpress.com/2010/04/19/खरंच-आपण-स्वतंत्र-झालो-आह/

      https://amrutmanthan.wordpress.com/2010/01/27/मराठीचा-उत्कर्ष-कसा-कराव/

      Mahatma Gandhi’s Thoughts on Medium of Education –} http://wp.me/pzBjo-w8

      https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/21/एकच-अमोघ-उपाय-मराठी-एकजूट/

      Lord Macaulay’s Psychology: The Root Cause behind British India’s Baneful Education System –} http://wp.me/pzBjo-uH

      https://amrutmanthan.wordpress.com/2010/04/04/बॅंकिंग-क्षेत्रामधील-भाष/

      आपल्याला, आपल्या कुटुंबियांना व मित्रबांधवांना ही दिवाळी व येते वर्ष सुखाचे, आनंदाचे व समृद्धीचे जावो अशी मनःपूर्वक शुभेच्छा.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.