महाराष्ट्रात आता सोबत आहे भाजप-शिवसेना, त्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादीचा झाली आहे दैना : रामदास आठवले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात आता सोबत आहे भाजप-शिवसेना, त्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादीचा झाली आहे दैना. संग्राम जगताप इथे पडणार आहेत फिके, आणि निवडून येणार आहेत सुजय विखे. अशी कविता सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. अहमदनगर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. विशेष म्हणजे, देशात पहिल्या टप्प्यातील मतदानही पूर्ण झालेले आहे, यादरम्यान अहमदनगर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलतांना सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक केले.

तसेच देशाचे प्रधानमंत्री कार्यसम्राट नरेंद्र मोदीजी काही मिनिटातच येथे येणार आहेत. डॉ. सुजय विखे तरूण आहे. मी सारखा विचार करत होतो. मी त्यांना सोडून इकडे आलोय. तुम्ही तिकडे काय करता. सुजयने अतिशय चांगला निर्णय घेतला. अन तो भाजपात आला. मागच्या वेळेस मी शिर्डीत पडलो. पण लगेच उभा राहिलो. एकटाच नाही पडलो त्यांना सुध्दा पाडले. बाळासाहेब विखे पाटील मला दिल्लीत भेटायचे. ते मला म्हणायचे तुम्ही शिर्डीत या. मी त्यांना म्हणायचो तुम्ही तिथे जा. पण त्यांना अहमदनगरची जागा दिली नाही. त्यामुळे ते नाराज झाले. त्यामुळे दोन्ही जागांवर आघाडीचा पराभव झाला. असे त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, आता मला तिकिट काही मिळाले नाही. म्हणून मी नाराज होतो. पण नाराज होऊन जायचे कुठे. काँग्रेस-राष्ट्रवादी खायलाच महाग आहेत. मी तिकडूनच आलोय. त्यामुळे इथेच थांबू म्हटले. मला माहिती आहे कुठून अन कसे मिळवायचे, असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर बोलतांना, त्यांनी अहमदनगरचे उमेदवार सुजय विखे यांच्यावर एक कविताही केली. संग्राम जगताप इथे पडणार आहेत फिके,आणि निवडून येणार आहेत सुजय विखे…आता हे लोक राहिले नाहीत मुके, मग का निवडून येणार सुजय विखे…आम्हाला नको आहेत, तुमच्याकडून फक्त फुलांचे बुके आम्हाला नको आहेत, तुमच्याकडून फक्त फुलांचे बुके आम्हाला तर हवे आहेत, डॉ.सुजय विखे मी इथे आलो आहे, सुजयला आणि सदाशिव लोखंडेंना निवडून देण्यासाठी …आणि मी मुंबईला जात आहे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बदला घेण्यासाठी….मी इथे आलो आहे, तुम्हाला सामाजिक न्याय देण्यासाठी…मी दिल्लीला जात आहे, मोदींचा जवळचा मित्र होण्यासाठी…नरेंद्र मोदीजी अंगार है, बाकी सब भंगार है नरेंद्र मोदीजी चौकिदार है, बाकी सब भागीदार है महाराष्ट्रात आता सोबत आहे भाजप-शिवसेना, त्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादीचा दैना. अशी कविताही त्यांनी सादर केली.