हिंगणघाट जळीत प्रकरणावरून उदयनराजे म्हणाले – ‘राक्षसी प्रवृत्तीला संपवण्याची वेळ आलीय’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून एका प्राध्यापिकेला पेट्रेल टाकून जाळण्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेत प्राध्यापिका गंभीर जखमी झाली असून या घटनेमुळे महाराष्ट्रासह देशातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवरून छत्रपती संभाजी महाराज संतापले असून आता बस्स, सहनशिलतेचा कडेलोट होत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. हिंगणघाट मधील प्रकरण ताजे असतानाच औरंगाबादमध्ये एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ही महिला 95 टक्के भाजली असल्याची माहिती समोर आली आहे.

या दोन्ही घटनांवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी या दोन्ही घटनांवर संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी छत्रपतींचा आदर्श घेऊन आरोपीला जशास तसे उत्तर द्यावे अशी भावना जनभावना तयार होत असल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. उदयनराजे भोसले यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

उदयनराजे भोसले यांनी हिंगणघाट आणि औरंगाबाद घटनांवरून संताप व्यक्त करताना ट्विटमध्ये म्हटले आहे की, माणुसपणाला काळीमा फासणारी घटना हिंगणघाट आणि औरंगाबाद येथे घडली. तरुण प्राध्यापिका व आज औरंगाबाद येथील महिलेला जिवंत जाळण्यात आले. या रक्षसी प्रवृत्तीला संपवण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात पोलिसांनी छत्रपतींचा आदर्श घेऊन आरोपीला जशास तसे उत्तर द्यावे अशी जनभावना तयार झाली असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

वर्ध्यातील हिंगणघाट येथील प्रकरण ताजे असतानाच आज औरंगाबादमधील अशाच प्रकारच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरून गेला आहे. औरंगाबादमध्ये घरात घुसून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.यामध्ये महिला 95 टक्के भाजली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटनला औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात घडली आहे. याप्रकरणी संतोष मोहिते या तरुणाला अटक केली आहे.