प्रशासक नियुक्तीनंतर अर्बनच्या 250 कोटींच्या ठेवी काढून घेतल्या, ठेवीदारांत भीतीचे वातावरण : माजी खा. गांधी ‘गोत्यात’ ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – प्रशासक नियुक्त झाल्यानंतर इतर बँका व पतसंस्थांनी नगर अर्बन बँकेतील २५० कोटी रुपयांच्या ठेवी काढून घेतल्या आहेत. मात्र, ८३ कोटींच्या नव्या ठेवी बँकेत जमा झाल्या आहे, असे बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनीच आज ही माहिती दिली. मोठ्या प्रमाणावर ठेवी काढल्याने बँकेतील ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिश्रा म्हणाले की, नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या ८०० कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी केवळ २४ कोटी रुपयांची वसुली झालेली आहे. बँकेचा २०० ते २५० कोटी रुपयांचा ‘एनपीए’ होता. बँकेने १०० कोटी रुपये थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. आतापर्यंत २० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडे ६० कोटी रुपयांचे कर्ज होते.

माजी खासदार गांधी येणार गोत्यात?
थकबाकी वसुलीसाठी पाच पथके तैनात करण्यात आली आहेत. बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळावर जबाबदारी निश्चित केल्यामुळेच रिझर्व्ह बँकेने त्यांना पदावरून दूर केले. मात्र त्यांनी नेमके काय केले, त्यांच्यावरील पुढील कारवाईबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे पाठविलेला नाही. परंतु माजी खासदार गांधी व संचालक मंडळावर जबाबदारी निश्चित झाल्यामुळे माजी खासदार गांधी हे गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. कर्ज मंजुरीची प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे.