‘कोरोना’ वॅक्सीनची मानवी चाचणी यशस्वी झाल्याचा दावा, ‘कन्फ्युज’ होईल ‘व्हायरस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना महामारी टाळण्यासाठी जगभरात त्याची लस बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान एका अमेरिकन कंपनी ‘इनोव्हियो’ ने दावा केला आहे की, INO-४८०० नावाच्या लसीची चाचणी ४० लोकांवर करण्यात आली, जी ९४ टक्के यशस्वी झाली.

एका वृत्तसंस्थेनुसार, या क्लिनिकल चाचणी दरम्यान १८ ते ५० वयोगटातील ४० लोकांची निवड केली गेली आणि त्यांना या लसीचा डोस दिला गेला. या सर्व लोकांना चार आठवड्यांत लसीचे दोन इंजेक्शन दिले गेले. या लसीमुळे प्रत्येकाची प्रतिकारशक्ती वाढली आणि कोणावरही प्रतिकूल परिणाम झाला नाही, असे या चाचणीत आढळले.

कंपनीच्या सिनियर व्हाईस प्रेसिडंटच्या मते, १० जानेवारी रोजी चीनी संशोधकांनी कोरोना विषाणूचा जेनेटिक कोड जारी केला, तर टीमने या अनुक्रमाला सॉफ्टवेअरद्वारे डीकोड केले आणि नंतर लसीचे सूत्र तयार केले.

ही डीएनए लस कोरोना विषाणूचे स्पाइक प्रोटीन ओळखून त्यासारखे प्रोटीन तयार करेल आणि व्हायरस गोंधळेल. त्यानंतर व्हायरस प्रोटीन जवळ येताच विषाणू निष्क्रिय होईल.

यामध्ये स्पाइक प्रोटीन मानवी शरीरात रोग प्रतिकारशक्ती विकसित करेल. लसीमुळे स्पाइक प्रोटीन तयार होईल, तेव्हा शरीर त्याला व्हायरस समजून जास्त प्रमाणात अँटीबॉडी बनवेल. या प्रोटीनमुळे शरीराला कोणतेही नुकसान होणार नाह, तर कोरोना विषाणू त्यामुळे नष्ट होईल.

तीन टप्प्यांवरील मानवी चाचणी यशस्वी झाल्यानंतर ती संबंधित देशाच्या औषध नियामक आयोगाकडे पाठवली जाईल. त्यानंतर त्या देशाचे सरकार लसीशी संबंधित सर्व बाबींचा गांभीर्याने व बारकाईने अभ्यास करेल.

यावेळी हे पाहिले जाते की, लसीचा मानवांवर कोणताही दुष्परिणाम तर होत नाही. त्यानंतरच त्याला उत्पादनाची मान्यता मिळते. या प्रक्रियेला ३ ते ४ महिने लागतात. कोरोना सध्या गंभीर पातळीवर असल्याने ही लस २ महिन्यांतही येऊ शकते.