Coronavirus : इटलीला मागे टाकत भारत ‘कोरोना’बधितांच्या आकडेवारीत जगात 6 व्या क्रमांकावर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात आता दररोज ९ हजारांहून अधिक कोरोना बाधित आढळून येत आहेत. त्यामुळे भारताने आज इटलीला मागे टाकत जगात कोरोना बाधितांच्या देशात ६ व्या क्रमांकावर पोहचला आहे. भारतात आता २ लाख ३६ हजार १८४ कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली आहे. याच वेळी इटलीमध्ये एकूण रुग्ण संख्या २ लाख ३४ हजार ५३१ इतकी झाली आहे. पुढील ५ दिवसात आपण इंग्लंडला मागे टाकून ५ व्या क्रमांकावर जाण्याची शक्यता आहे.

गेल्या २४ तासात भारतात ९ हजार ४७१ नवीन रुग्ण वाढले, त्याचवेळी इटलीमध्ये केवळ ५१८ नवीन रुग्ण वाढले. त्यामुळे भारत इटलीला मागे टाकत ६ व्या क्रमांकावर पोहचला. इटलीमध्ये सध्या केवळ ३६ हजार ९७६ कोरोना रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. गेल्या २४ तासात तेथे १ हजार ८०० हून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले. याउलट भारतात १ लाख १६ हजारांहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. भारतात गेल्या २४ तासात ४ हजार ७४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

चीनमधील वुहान शहरात कोरोनाचा सर्वप्रथम कोरोनाचा संसर्ग होऊन तो जगभरात पोहचला. चीननंतर इटलीमध्ये त्याचा सर्वाधिक उद्रेक झाला होता. पण, त्यातून इटली आता सावरला असून तेथे आता कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. इटलीने पर्यटनास परवानगी दिली असून देशातील कॅसिनोही सुरु करण्यात आले आहेत. तेथील जगप्रसिद्ध संग्रहालये खुली करण्यात आली आहेत. असे असताना भारतात मात्र आता कोरोनाचा अधिकाधिक प्रादुर्भाव होताना दिसत आहे.

भारताच्या पुढे आता अमेरिका १९ लाख ६५ हजार ७०८, ब्राझिल ६ लाख ४६ हजार ६, रशिया ४ लाख ४९ हजार ८३४, स्पेन २ लाख ८८ हजार ५८ आणि इंग्लंड २ लाख ८३ हजार ३११ रुग्ण हे देश पुढे आहेत.