कोरोना व्हायरस लसीचा माणसांवरील चाचणीचा पहिला टप्पा सुरु, जुलै पर्यंत दिसतील परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बायोटेक कंपनी नोव्हामॅक्सने माणसांवर कोरोना व्हायरस लसीची चाचणी सुरू केली आहे. सोमवारी कंपनीने याची माहिती देताना सांगितले की, त्यांनी पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी सुरू केली आहे. ही माणसांवर कसे काम करते, त्याचे परिणाम जुलैपर्यंत येतील. अमेरिकन कंपनी नोव्हामॅक्सने ऑस्ट्रेलियामध्ये माणसांवर कोरोना व्हायरस लसीची ही चाचणी सुरू केली आहे.

कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, लस तयार करण्यासोबतच आम्ही त्याचा डोसही तयार करत आहोत. आम्ही आशा करतो की, हे व्हायरस विरूद्ध काम करत आहे हे दाखवून देऊ आणि वर्षाच्या अखेरीस बाजारात आणण्याचा प्रयत्न करू. पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाल्यास दुसर्‍या टप्प्यात अमेरिकेसह अनेक देशांमध्ये चाचण्या घेण्यात येतील, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

बर्‍याच कंपन्या सध्या कोरोना विषाणूची लस बनवण्याचे काम करत आहेत. चीन, अमेरिका आणि युरोपमधील बर्‍याच कंपन्या यावर काम करत आहेत. मात्र, यात अद्याप कोणतेही महत्त्वपूर्ण यश मिळालेले नाही. महामारीची लस कधीपर्यंत येईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या विषाणूचा प्रादुर्भाव दररोज वाढतच आहे. जगात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ५५,८४,२६७ वर गेली आहे. आतापर्यंत जगभरातील ३,४७,६१३ लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. जगभरात कोरोना संक्रमणा नंतर बरे झालेल्या लोकांची संख्या २३,६२,३९० आहे. तसेच भारतात गेल्या २४ तासांत ६५३५ नवीन प्रकरणे समोर आली असून १४६ लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर देशभरात कोरोना संक्रमितांची संख्या वाढून १,४५,३८० झाली आहे आणि आतापर्यंत ४,१६७ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ८०,७२२ ऍक्टिव्ह प्रकरणे असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच ६०,४९१ लोक संक्रमणा नंतर बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत.