बैलाचा Birthday सेलिब्रेट करणे पडले महागात, एकावर FIR दाखल

डोंबिवलीः पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरी देखील लोक गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. डोंबिवलीमध्ये एकाने मित्रमंडळींना बोलावून मोठ्या प्रमाणात गर्दी करत चक्क बैलाचा वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार घडला आहे. गुरुवारी (दि. 11) रात्री घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

किरण एकनाथ म्हात्रे (रा. मोठागाव, डोंबिवली) असे गुन्हा दाखल झालेल्या बैलमालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरण म्हात्रे याने गुरुवारी त्याचा बैलाचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. यासाठी त्याने घराजवळच गोवर्धन टॉवरच्या समोर स्टेज बांधून मित्रमंडळींना मोठ्या संख्येने बोलावून गर्दी केली होती. तसेच बैलाचा वाढदिवस साजरा करताना अनेकांननी स्टेजवर डान्स देखील केला. यावेळी अनेकांनी मास्क घातला नव्हता. त्यामुळे गर्दी जमवून मास्क न लावता निष्काळजीपणे स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घातल्या प्रकरणी म्हात्रे याच्यावर पोलिसांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.