…अन् अमित ठाकरेंनी थेट बैलगाडीच चालवली !

पोलीसनामा ऑनलाईन – मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या एका वेगळ्या अंदाजामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. अमित ठाकरे पुणे जिल्ह्यातील सावरदरी (ता. खेड) येथे मनसेच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी गेले होते. यादरम्यान त्यांनी काही वेळ बैलगाडी चालवली. त्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. तसेच अमित यांनी बैलगाडी चालवल्याने उपस्थित असणारे कार्यकर्ते देखील भारावून गेल्याचे पाहायला मिळाले.

 

 

मुंबई महापालिकेच्या आगामी नि़वडणूकीसाठी मनसेने कंबर कसली आहे. कल्याण-डोंबिवलीतील दोघा नेत्यांनी मनसेला सोडचि्ठ्ठी देऊन भाजप आणि सेनेची वाट धरल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. राज ठाकरे मनसेच्या नेत्यांना महापालिका निवडणुकीसाठी लोकसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी दिली आहे. विशेष म्हणजे अमित ठाकरे यांच्यावरही मुंबईतील उत्तर पूर्व मतदार संघातील वॉर्डांची जबाबदारी दिली आहे. पक्षाने जबाबदारी दिल्यानंतर दिवसभर अमित ठाकरे यांची सोशल मीडियावर चर्चा होती. तसेच मनसे कार्यकर्ते देखील या निर्णयाने आनंदी असल्यचे दिसून येत आहे. मात्र याचदरम्यान अमित ठाकरे यांनी थेट बैलगाडी चालवल्याने ए का वेगळ्या अंदाजामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

दरम्यान, अमित ठाकरे अत्यंत संयमी आहे. त्यामुळे त्याच्या मार्गदर्शनाखाली पक्षाला उत्तर पूर्वमध्ये चांगल यश मिळेल, त्याची मेहनतीची संपूर्ण तयारी असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.