मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना एनआयएने अटक केली आहे. या प्रकरणातील स्फोटकांच्या गाडीचा तपास NIA कडून सुरू आहे. अंबानींच्या घराबाहेर पीपीई किट घालून आढळलेली व्यक्ती सचिन वाझेच असल्याचा संशय एनआयएच्या अधिकाऱ्यांना आहे. पण त्या व्यक्तीने पीपीई किट नव्हे, तर पांढरा कुर्ता परिधान केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली केल्यानंतर ही नवी माहिती समोर आली आहे. सीसीटीव्हीत काही कळू नये, स्वत:ची ओळख पटू नये म्हणून वाझेंनी पांढरा कुर्ता परिधान केला असावा. पीपीई किट घातल्यास कोणालाही सहज संशय येईल. म्हणून त्यांनी पांढरा कुर्ता घालून डोक्याला रुमाल आणि तोंडाला मास्क लावला असावा, असा संशय एनआयएला आहे. याची पडताळणीसाठी एनआयएने तपास सुरु ठेवला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पांढऱ्या कुर्त्यामधील व्यक्तीचे फक्त डोळेच दिसत आहेत. एनआयए चौकशीत वाझे अधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. वाझेंकडे मोबाईल नव्हता. याबद्दल अधिकाऱ्यांनी वाझेंना विचारणा केली असता, माझा मोबाईल कामाच्या गडबडीत हरवल्याचे उत्तर वाझे यांनी दिले आहे. वाझे यांचा लॅपटॉप एनआयएने ताब्यात घेतला आहे. मात्र तो फॉरमॅट करण्यात आला आहे.