घासकागद : वस्तूचा पृष्ठभाग गुळगुळीत किंवा तुकतुकीत करण्यासाठी वापरण्यात येणारा कागद. लवचिक अशा आधारपृष्ठावर आसंजक (पृष्ठभागावर धरून ठेवणारा पदार्थ) लावून त्यावर अपघर्षकाच्या (खरवडून वा घासून पृष्ठभाग गुळगुळीत करणाऱ्या पदार्थाच्या) कणांचा पातळ थर देऊन असा कागद तयार करतात. त्याला लेपित अपघर्षक अशी तांत्रिक संज्ञा आहे.

आधारपृष्ठ म्हणून चिवट व टिकाऊ कागद, कापड किंवा विशिष्ट प्रकारे तयार केलेले कातड्यासारखे कापड यांचा उपयोग करतात. कापडासारखा लवचिक व मजबूत कागद बनविता येऊ लागल्यामुळे दिवसेंदिवस कापडाऐवजी कागदाचा वापर वाढत आहे. मुख्यतः कातड्यापासून बनविलेल्या सरसाचा व विशिष्ट उपयोगांकरिता लागणाऱ्या कागदात फिनॉलिक रेझीन किंवा कृत्रिम व्हार्निश यांचा आसंजक म्हणून उपयोग करतात. रेती, फ्लिंट, एमरी, गार्नेट, ॲल्युमिनियम ऑक्साइड, सिलिकॉन कार्बाइड किंवा क्रोकस (फेरिक ऑक्साइडाचा तांबडा प्रकार) यांच्यासारख्या अपघर्षकांचे कण कागदांवर चिकटविण्यासाठी वापरतात. अशा कणांचे आकारमान १२ ते ६०० मेशच्या दरम्यान असते. (मेश हे कणांच्या आकारमानाचे एकक आहे). कणांच्या आकारमानानुसार आधारपृष्ठावर आसंजकाचा किती जाड थर द्यावयाचा ते ठरवितात. असा आसंजक लावलेला कागद लेपन यंत्रात पुढे सरकत असताना त्याच्या पृष्ठावर चाळणीतून अपघर्षकाचे कण पडतील अशी व्यवस्था केलेली असते. या जुन्या पद्धतीच्या जागी नवीन स्थिर विद्युतीय पद्धती प्रचारात येत आहे. नव्या पद्धतीत पट्टावाहक अपघर्षकाचे कण वाहून नेत असतो व आसंजक लावलेला कागदी पट्टा त्याच्या वरच्या बाजूने जात असतो. दोन्ही पट्टे आडव्या दिशेत सरकत असतात. पट्टावाहक व त्यावरचे कण यांवर प्रखर ऋण विद्युत् भार येतो व कागदी पट्ट्यावर तितकाच प्रखर धन विद्युत् भार येतो. दोन्ही पट्टे स्थिर विद्युत् क्षेत्रामधून जात असताना अपघर्षकाचे कण कागदी पट्ट्याकडे ओढले जाऊन त्यावर चिकटून बसतात. कागदावर चिकटताना कणांची चापट बाजू आसंजकात जाते व टोकदार बाजू बाहेर राहते. या पद्धतीने बनविलेला कागद अधिक धारदार व टिकाऊ असून तीत अपघर्षकाचे कणही कमी लागतात व अधिक चांगल्या प्रतीचा घासकागद मिळतो. बहुधा कागदावरील कण दाट पसरलेले असतात परंतु विशिष्ट उपयोगासाठी कण विरळ असणारे कागद आवश्यक असतात. कधीकधी आणखी एक थर देऊन कागद प्रबलितही करतात. सामान्यतः अशा कागदांच्या ०·६२५ सेंमी. ते १२५ सेंमी. रुंद व ४६ मी. लांब तुकड्यांच्या गुंडाळ्या तयार करतात. परंतु उपयोगांनुसार त्यांचे तुकडे, चकत्या, वेटोळी, गुंडाळी इत्यादीही तयार करतात.

पूर्वी केवळ लाकूडकामातच काचेचे कण लावलेल्या घासकागदाचा उपयोग होत असे. परंतु दिवसेंदिवस घासकागदांचा औद्योगिक उपयोग वाढत असून आता ते एक औद्योगिक उपकरणच बनले आहे. लाकूडकाम, धातुकाम, कातडी कमाविणे, बूट तयार करणे, टोप्यांवर शेवटचा हात फिरवणे इत्यादींमध्ये पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. निरनिराळ्या यंत्रा-उपकरणांमध्येही त्यांचा उपयोग केला जातो.

ठाकूर, अ. ना.