कॅमेरा

कॅमेरा पुरूष असतो
कॅमेरा पुरूषी असतो

तो साठवून घेतो सौंदर्य स्वतःत
सौंदर्य… कधी धावतो पाठीपाठी
कधी मनमानी वळवून घेतो
पुढ्यात स्वतःच्या

कधी कधी तर सौंदर्यच
धावत सुटतं… भान हरपून
कॅमेर्‍यात, एका पुरुषात
चाचपून पहातं
स्वतःचीच प्रतिमा
सदैव देहभान बाळगत जगण्याऐवजीचा
सोपा मार्ग आहे का हा?

कॅमेरा पुरूष असतो
तो उघडं पाडतो
सौंदर्यांचं स्त्रैण्य स्वतःसमोर
आस्वादानंद तर घेतोच
शिवाय साठवून ठेवतो स्मृतीत
वारंवार तुलनेसाठी

कॅमेरा पुरूषी असतो
सौंदर्य, जरी असलं उच्चकोटीचं
तरी सौंदर्योपासकाची भुरळसुद्धा
पराकोटीचीच
मग सौंदर्य करू पहातं कुरघोडी
‘त्या’च्या सृजनशील दृष्टीवर

सृजनावर पौरूषाने कुरघोडी केली
तरी किंवा कसंही,
स्त्रैण्य सौंदर्यांचे पुरूषी नजरेतील
शिक्के प्रतिमांकित होतातच

आणि जर झालीच कुरघोडी
तरी सृजन होतंच
मात्र, कलेचा बळी जाऊन…

आल्हाद महाबळ
०७.२९ संध्याकाळी
३० डिसें ११

One thought on “कॅमेरा”

यावर आपले मत नोंदवा