अज्ञाताची चाहूल : (भाग : 37)

आईबाबा यु.एस.ला गेले आणि त्यानंतरचा विकेंड. सु.सा.सुस्तावून घरात बसला होता. संध्याकाळी त्याचा ऑफिसमधला कलीग आणि मित्र कौस्तुभ घरी येणार होता, ऑफिसचं काही काम करायला. पण सकाळचा वेळ तसं काहीच काम नव्हतं. घर नीटनेटकं ठेवण्याच्या बाबतीत तो तसा आळशीच होता. आईबाबा गेल्यावर स्वतःचे चहाचे कपसुद्धा त्याने उचलून ठेवलेले नव्हते.काल रात्री ऑफिसचं काम काढून बसला होता त्यातले काही पेपर्स सुद्धा अजून तिथेच होते. कंटाळून तो उठला. कौस्तुभ येईल तेव्हा घर जरा तरी ठीकठाक करून ठेवायला हवं, असं म्हणून तो सगळी साफसफाई करायला घेणार तेवढ्यात बेल वाजली.

समोर गौरव दीक्षित उभा होता.

———————————————–

दोनतीन पानं वाचून झाली असतील. अजून त्यात सुजयचा उल्लेखही आलेला नव्हता. पण तरी ती एक कथा म्हणून वाचावीशी वाटत होती. त्यातलं वर्णन खूप रिअल वाटत होतं. ही कथा नसणार, हे खरं घडलेलंच असणारसिद्धार्थला वाटत होतं. पुढचं पान उलटून तो वाचायला सुरुवात करणार तेवढ्यात खोलीत काहीतरी सळसळल्यासारखा आवाज आणि त्यापाठोपाठ कुणाच्यातरी अस्पष्टसं हसण्याचा आवाज आला …..आणि तो जागीच थिजला….

 

************************** भाग ३६ पासून पुढे *******************************

भाग ३६ येथे वाचा <<– http://wp.me/p6JiYc-Uv

हातातली डायरी नकळतच खाली ठेवून सावधपणे बसल्या जागेवरूनच संपूर्ण खोलीभर त्याने नजर फिरवली. पण डोळ्यांना खटकेल, असं काहीच नव्हतं. पण मग तो आवाज कुठून आला होता? त्याने इतक्यातच कधीतरी तसला आवाज ऐकला होता. इतक्यातच म्हणजे कधी? ह्याचं उत्तर सोपं होतं. त्या घरात. तिथे अगदी असाच आवाज ऐकला होता त्याने. सळसळण्याचा, कुणाच्यातरी हसण्याचा. पण मग तो आवाज इथे का आला आपल्याला? म्हणजे जर हा त्या मुलीचा आवाज असेल, तर ह्याचा अर्थ ती आपला पाठलाग करत इथे सुद्धा आली आहे? समोर चढत जाणारी रात्र, रस्त्यावरचा वाढत चाललेला शुकशुकाट, हॉटेलच्या त्याच्या खोलीबाहेरच्या पॅसेजमध्ये पसरलेली शांतता हे सगळं आता त्याला जाणवलं. दिवसभर आलेले गूढ अनुभव आठवले आणि आजूबाजूच्या ह्या पार्श्वभूमीवर स्वतःचं एकटेपण त्याला जास्तच जाणवलं. त्या घरात त्याला जे दिसलं, जे ऐकू आलं तो अनुभव आता पुन्हा ह्या हॉटेलच्या खोलीत घ्यायला आता त्याची अजिबात तयारी नव्हती.

 

अस्वस्थपणे त्याने खोलीत एक फेरी मारली. काय करावं? समोर ती डायरी पडलेली दिसत होती. हातातोंडाशी आलेला घास असा बाजूला सारायचं त्याला जीवावर आलं होतं. कदाचित त्या डायरीमध्ये जे लिहिलं होतं ते वाचल्यावर सुजयबद्दलचं सगळं सत्य त्याला कळणार होतं, अगदीच काही नाही तर निदान काहीतरी महत्वाची माहिती हाती लागली असती. पण आत्ता ऐकू आलेल्या आवाजामुळे तो मनातून पुरता घाबरला होता. डायरीच्या दिशेने पुढे पाय टाकण्याचीही त्याची हिम्मत होत नव्हती.

 

अचानक त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आज त्या घरात जातानाही सायलीशी आपण बोलत आत गेलो त्यामुळे निदान सुरुवातीला तरी भीती वाटली नाही. बरोबर, प्रश्न आपण का घाबरलोय त्याचा आहे. कदाचित आत्ता दिवस असला असता, बाहेर रस्त्यावर वर्दळ असली असती, आजूबाजूला बोलण्याचे आवाज आले असते तर आपण ती डायरी वाचण्याची हिम्मत नक्कीच करू शकलो असतो. प्रश्न वेळेचा आणि सोबतीचा आहे. रात्रीची शांततेची वेळ आणि त्यात आपण एकटे आहोत, आपल्याला काही झालं तर रात्रीच्या वेळी कुणाला काही कळणारही नाही, हा विचार कुठेतरी मनात दबा धरून बसलाय. म्हणून आत्ता आपण हिम्मत करू शकत नाहीयोत. आणि इतक्या रात्री आता सायलीलाही फोन करता नाही येणार. पण मग ह्याच्यावर उपाय काय? हॉटेलच्या रिसेप्शनच्या एरियामध्ये जाऊन बसलं तर? हो बरोबर, तिथे एक टीव्ही आहे आणि कालसुद्धा रात्री हॉटेलमध्ये काम करणारी माणसं तिथे टीव्ही बघत बसली होती. हो, कदाचित तिथे जाऊन, तिथे बसून ही डायरी वाचली तर जास्त सोपं होईल सगळं आपल्यासाठी.

 

मनात विचार आला आणि भराभर ती डायरी, एक पेन, रूमची किल्ली आणि मोबाईल हे सगळं गोळा करून तो रूमच्या बाहेर पडला सुद्धा.

—————————————————–

—————————————————–

त्या रात्री सु.सा.ला सुद्धा झोप येणं शक्यच नव्हतं. आई-बाबा येतायत म्हटल्यावर त्याच्या मनात वादळ उठलं होतं. सुजयला मदत करण्याचा निर्णय त्याला आता जास्त खटकायला लागला होता. अर्थात, आई-बाबांना काही कळलं असण्याची शक्यता नव्हती पण तरी त्यांच्या समोर जाणं त्याला जड जाणार होतं. कदाचित म्हणूनच आज झोप लागत नव्हती. सतत पुन्हा पुन्हा मागचं आठवायला लागलं होतं. कदाचित कुठल्या परिस्थतीत आपण सुजयला मदत केली, ह्याची स्पष्टीकरणं तो शोधत होता, स्वतःचंच समाधान करून घेण्यासाठी…..

त्या दिवशी रविवारी संध्याकाळी सुजय (म्हणजे गौरव ) अचानक घरी आला आणि मग त्यानंतर ….

—————————————————–

हाय सुजय……” गौरवच्या चेहऱ्यावर इतक्या दिवसांनी भेटल्याचा आनंद दिसत होता.

 

गौरव …..हाय ….व्हॉट अ प्लेझंट सरप्राईझ…..अरे कुठे होतास तू इतके दिवस मी किती ट्राय केलं तुला कॉन्टॅक्ट करण्याचा…..” सु.सा.

 

हो, आय नो, तू प्रयत्न केलाच असशील पण….मी सांगतो पण आत येऊ का आधी ?” गौरव

 

अरे अर्थात, सॉरी तुला एकदम समोर बघून डोक्यात इतके प्रश्न सुरु झाले की तुला आत यायला पण नाही सांगितलं मी…”

थोड्या वेळाने गप्पा मारण्यासाठी दोघेही सोफ्यावर येऊन बसले. मग आईने घरात करून ठेवलेला चिवडा बाहेर निघाला. चहासुद्धा झाला आणि आता त्याचं व्यवस्थित आदरातिथ्य करून झाल्यावर गप्पा मारण्याची वेळ होती.

 

सो….टेल मी नाऊ….अरे होतास कुठे? आणि हॉस्पिटलमध्ये भेटायला येणार होतास तिथून जणू काही गायबच झालास तू तर…..मगाशी खाताना तुला सगळं विचारत बसायचं नव्हतं मला. पण तुला बघितल्यावर परत हे सगळे प्रश्न पडायला लागले माहित आहे?”

 

आय कॉम्प्लिटली अंडरस्टँड सुजयआणि बरोबरच आहे….मीच मध्ये काही कॉन्टॅक्ट ठेवला नाही, तुला प्रश्न पडणारचपण अक्चुअली जरा प्रॉब्लेम झाला होता अरे. म्हणजे हॉस्पिटलच्या जवळचं हॉटेल बघून मी तिथे त्या दिवशी रात्री राहायला गेलो पण रात्री एका क्लायंटचा फोन आला, काहीतरी मेजर प्रॉब्लेम झाला होता, खूप अर्जंटली हॅण्डल करायला लागणार होतं सगळं. मला लगेच त्याच रात्री निघून क्लायंटच्या साईटवर जायला लागलं, गुजराथला. एवढ्या रात्री काही तुला कळवता आलं नसतं पण विचार केला होता की तिथलं सगळं सॉर्ट झालं की तुला फोन करून सांगेन. पण तिथे पोहोचलो, ते काम पूर्ण होतंय न होतंय तेवढ्यात गावाहून फोन आला आई पाय घसरून पडल्याचा. मग धावत तिथे जायला लागलं. “

 

अरे बापरेआय होप मग सगळं ठीक होतं…”

 

हो रे आता ठीक आहे आई. मागचा महिनाभर तिच्याच जवळ होतो मगएकतर तिथे गावाला कोणी चांगली क्वालिफाईड नर्स मिळणं जरा कठीण. एक मिळाली होती पण एक आठवडाभरात काम सोडून गेली. तिथे गावात नातेवाईक असतात आमचे पण असं सांगणार तरी कोणाला? आणि कशाला? म्हटलं त्या निमित्ताने जरा आईजवळ राहता पण येईलम्हणून मग तिथेच होतो दीडेक महिना….”

 

आणि कामाचं काय मग?”

 

कामावर परिणाम झालाच रे थोडाकाय आहे ज्या क्लायंट्सना पर्सनली भेटायला जावं लागतं, त्यांना सध्या तरी जमणार नाही असंच सांगायला लागलं. ज्यांना फोनवर, ईमेल वर डिस्कस करून पुढे जायला जमत होतं, ते काम थोडं पुढे गेलं. पैशांचं नुकसान होतं रे, पण म्हटलं आईपुढे आणखी काहीच मोठं नाही. तिला पण बरं वाटलं रे मी राहिलो तिथे तर….”

 

हो खरं आहे….पण मग अरे तू फोन का नाही केलास मला? मेसेज तरी एखादा? माझ्या इमेल्स ना तरी रिप्लाय करायचा ना…..”

 

हो सुरुवातीला खरंच खूप बिझी होतो अरे…..आईला हॉस्पिटलमध्येच ठेवलं होतं थोडे दिवस….मग तिथे सगळी धावपळ करायला लागली. मग घरी आणल्यावर वेगळी धावपळ, त्यात जमेल तसं काम सुरू ठेवायचं होतं….सगळ्या गडबडीत मी खरं तर तुला विसरूनच गेलो. तुझा ईमेल वगैरे बघितला पण आल्रेडी इतके दिवस झाले होते म्हटलं आता गावाहून परत आलो की डायरेक्ट भेटायलाच येऊ तुलादोन आठवडे झाले मला येऊन इथे, पण इथे आल्यावर कामाचा व्याप परत इतका वाढला की परत बिझी झालो. पण आता म्हटलं विकेंडला भेटायला यायचंच तुला आणि तेपण आधी न कळवता……”

 

आणि मला कळतच नव्हतं तू असा गायब कुठे झालास ते…..”

का कोण जाणे पण त्याच्या सुरुवातीच्या वाक्यांवर सु.सा.चा तितकासा विश्वास बसला नव्हता खरं तरपण त्याने नंतर सांगितलेल्या गोष्टी ऐकता ऐकता त्याला त्याचं सगळंच म्हणणं पटत गेलं. त्याच्या आईवडिलांना भेटणं टाळण्यासाठी त्याने हे सगळं नाटक केलं असेल, हा एवढा विचार करण्याएवढा तर त्याला अजिबातच संशय आला नाही.

 

थोडा वेळ इकडच्यातिकडच्या गप्पा मारून झाल्या आणि मग पुढे आणखी काय बोलायचं असा प्रश्न दोघांनाच पडला असावा. सु.सा.ने घड्याळाकडे एक नजर टाकली. दुपारचा दीड वाजत आला होता..

मी काय म्हणतो गौरव, तू जेवूनच जा आता. मी काहीतरी ऑर्डर करतो. नाहीतर….आपणच जाऊ बाहेरआमच्या इथे जवळच बरेच ऑप्शन्स आहेत….मी….”

पण त्याला मधेच तोडत तो म्हणाला,

नाही अरे ….जेवायचं खरंच राहूदेत….अक्चुअली मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी….एवढा वेळ झाला मी विचार करतोय खरं तर तुला कसं सांगू….”

त्याचं अचानक बदललेला स्वर ऐकून सु.सा.सुद्धा विचारात पडला. एवढं काय होतं जे सांगायला त्याला अवघड वाटत होतं? मग एकदम त्याच्या डोक्यात प्रकाश पडला….

काय झालंय नक्की? तुला काही मदत हवी आहे का माझ्याकडून? त्यात एवढं अवघड वाटण्यासारखं काहीच नाही अरेमीच तुला आधी म्हटलं नव्हतं का? …बरं मी डायरेक्ट विचारतो तुला म्हणजे तुलापण जास्त ऑकवर्ड नाही होणार….पैशांची काही मदत हवी आहे का? प्लिज सांग ….तू माझ्यासाठी आऊट ऑफ द वे जाऊन आणि काहीही संबंध नसताना एवढं केलं आहेसत्यामुळे माझ्याकडे काही मागताना एवढं ऑकवर्ड व्हायची काहीच गरज नाही …..”

पण समोरून गौरवचं काहीच उत्तर आलं नाही. त्याची अस्वस्थ चुळबुळ मात्र सु.सा.ला दिसत होती.

गौरव अरे प्लिज बोल ना काहीतरी…..”

 

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझं नाव गौरव दीक्षित नाही, सुजय साने आहे….”

————————————————————

—————————————————–

सिद्धार्थ खालच्या मजल्यावरच्या हॉटेलच्या लॉबीमध्ये आला. त्याच्या अपेक्षेप्रमाणेच तिथला टीव्ही चालू होता आणि हॉटेलच्या स्टाफपैकी तीनचार जण तिथे बसून पत्ते खेळत होतेत्याच्यातल्या एकाला सिद्धार्थ ओळखत होता.गेले दोन दिवस त्याच्या खोलीत चहा घेऊन तोच आला होता. सिद्धार्थकडे लक्ष जाताच तो ओळखीचं हसला. पण आत्ता खोलीत वाटणाऱ्या भयानक एकटेपणापेक्षा फारशी ओळख नसलेलं ते हसूसुद्धा सिद्धार्थसाठी पुरेसं होतं. कोपऱ्यात ठेवलेल्या एका खुर्चीवर तो जाऊन बसला. समोर छोटं टेबलसुद्धा होतं. त्याच्यावर ती डायरी ठेवून त्याने त्यातली पानं उलटायला सुरुवात केली. आणि एका पानावर तो थांबलापाच-सहा पानं भरून लिहिलेला मजकूर. सिद्धार्थने आता मात्र न राहवून एकदम वाचायला सुरुवात केली.

*****************************

ये अंधेरा ….एक समय था जब अंधेरा मतलब टिमटिमाते तारे और शांत आकाश था हमारे लिये….अब बस वो अंधेरा है, और कुछ नही

 

पंधरा दिनये पंधरा दिन क्या तुफान लेके आये है….ख़ुशी, नाराजगी, प्यार , दोस्ती, आसू, और न जाने क्याइतना सब ….यकीन नही होता, एक तरफ ख़ुशी है के मेरी मेहनत को, दो साल की मेहनत और बरसोसे देखा ख्वाब ये सब अब मेरे दरवाजे तक आता हुआ दिख रहा है….लेकिन दुसरी तरफ कुछ हाथसे छुट रहा है, दूर जा रहा है, क्या करू मै? अम्मा को पता चलेगा तब उसको क्या लगेगा? मै इतना बडा कुछ सोच रही थी मेरे जिंदगी के बारेमे उसे बिना बतायेंआज तक सिर्फ दो लोग है मेरे जिंदगी मे जिनसें कभी कुछ नही छुपाया…..

***********************

पहिल्या पानावर आणखीही असंच बरंच काही लिहिलं होतं. त्यावरून बाकी कसलाच नाही पण लिहिणाऱ्या व्यक्तीच्या मनाचा आणि मनात चालू असलेल्या खळबळीचा अंदाज येत होता. हे सगळं एका मुलीने लिहिलं होतं हे कळतच होतं. कदाचित जिची डायरी होती, कोमल व्यास, तिनेच लिहिलं असावं. पण संदर्भ लागत नव्हता. पण एकूणच ह्या लिखाणाची पद्धत त्याला आवडली. मनातले विचार किती परफेक्ट लिहून काढले होते. शब्दसुद्धा थिल्लर नव्हते, त्याला एक चांगला दर्जा होता.

 

त्याने पान उलटून पुढे वाचायला सुरुवात केली. पुढच्या पानावरचा पहिलाच शब्द होता – “सुजय“. पुढे तो जसजसं वाचत गेला, तसतसं त्याला काही गोष्टींचा उलगडा व्हायला लागला. अर्थात त्यांना पडलेली कोडी काही त्यामुळे लगेच सुटणार नव्हतीच. अजून पहिल्या पानावर त्या मुलीने जे लिहिलेलं होतं, त्याचा काहीच संदर्भ लागत नव्हता. . पण तो जसजसं वाचत गेला तसतसा त्याच्या आजूबाजूचा उजेड कमी होत गेल्याचं त्याला जाणवत गेलं. आजूबाजूच्या माणसांचं अस्तित्वसुद्धा हळूहळू जाणवेनासं झाल्यासारखं वाटलं त्याला, पण आता तो थांबणार नव्हता. कमी होत जाणाऱ्या उजेडात सुद्धा डोळ्यांना प्रचंड ताण देऊन तो डायरी वाचत राहिला, इतका वेळ की आता हळूहळू पूर्ण अंधार झाला. समोरचं काहीच दिसेनासं झालं.

 

अचानक असा अंधार कसा झाला? इथले लाईट्स गेले की काय? ? काय हॉटेल आहे….लाईट्स गेले तर इमर्जनसी लाईट्स लावायचे ना ह्यांच्याकडे असतील तरी की नाही इमर्जन्सी लाईट्स काय माहित….पण निदान मेणबत्ती तरी? आणि इथे ते लोक टीव्ही बघत बसले होते ते कुठे आणि कधी गेले? आपल्याला कळलंही नाही. “कोई है यहापर? अरे छोटासा तो दिया, कुछ तो लगाओ भाई…..” पण सगळे झोपायला गेले होते बहुतेकसगळी सामसूम होती…..आता काय करायचं? इथे असं किती वेळ बसून राहणार? लाईट कधी येतील काय माहित? त्याने चाचपडत समोरचा मोबाईल उचलला आणि त्यात वेळ बघितली. रात्रीचे अडीज वाजून गेले होतेखूपच उशीर झालाय. आता इतक्या काळ्यामिट्ट अंधारात मोबाईलच्या टॉर्च मध्येसुद्धा वाचता येणार नाही. खोलीत जाऊन झोपून जाऊया का? अंधारात जागत बसून तरी काय करणार? त्याने बसल्या बसल्याच खोलीकडे कसं जायचं हे एकदा आठवून बघितलंइथून डाव्या बाजूला वर जाणारा जिना होता. वरच्या मजल्यावर गेलं की डाव्या आणि उजव्या बाजूला खोल्या होत्या. डावीकडच्या बाजूला चालत गेलं की शेवटून दुसरी रूम त्याची होती. मोबाईलच्या उजेडात तिथपर्यंत चालत जाणं शक्य होतं.

 

तो उठला आणि मोबाईलच्या उजेडात वाट बघत जिन्याच्या दिशेने चालायला लागला. अचानक त्याच्या लक्षात आलं, “ही शांतता जरा वेगळीच आहे. कुठेतरी, कुठल्यातरी रूममध्ये लाईट्स गेल्यामुळे कोणी जागं झालेलं असेल, लोकांच्या बोलण्याचा आवाज असेल, कोणी परिस्थितीचा अंदाज घ्यायला बाहेर येईल…..पण असं काहीच दिसत नाहीये इथे….सगळं इतकं शांत कसं? इतकी सामसूम? आज त्या घरात हा असलाच अंधार आणि जीवघेणी शांतता अनुभवली होती नाही का आपण?…..”

 

शेवटचा विचार मनात येताच तो पायरीवरच थबकला. आत्ता या वेळेला ते सगळं आठवायला नको होतं. पण मनातले विचार आता आणखी जलद उमटायला लागले. “आत्ता सुद्धा हा असलाच काही अनुभव आला तर? आपण ती डायरी आणून वाचली. ती जी कुणी आहे, तिला ते आवडलं नाही आणि त्यासाठी ती पुन्हा आली तर ? आपल्यावर सूड उगवायला? ”

 

विचार करताकरताच त्याने जिना चढायला सुरुवात केली. समोरून कुणी जिना उतरत येतंय का? तो एकदम दचकला. मोबाईलचा टॉर्च समोर मारून बघितलं, कुणीच नव्हतं. पण मग त्याला असं का वाटलं की कुणीतरी येतंय, त्याच्याकडे बघत बघत जिना खाली उतरतंय, त्याच्या बाजूने जिना उतरून गेलंय….हे सगळं त्याला दिसलं होतं, भास झाला होता की तो त्याच्या मनातच हे सगळं चित्र रचत होता? त्याला आता काहीच कळेनासं झालं. पण ते जे कुणी जिना उतरत गेलं, ते आता माझ्या मागे असेल का? मागून माझ्याकडे रोखून बघत असेल? एकदम न राहवून त्याने मागेसुद्धा टॉर्चचा एक झोत मारून खात्री करून घेतली.

 

आता त्याने काहीही विचार न करता सरळ झपझप वरच्या पायऱ्यांवर उडी मारत अक्षरशः पळायलाच सुरुवात केली. वरच्या मजल्यावर आल्यावर डाव्या बाजूला वळत त्याने आणखी जोरात चालत एक एक खोली मागे टाकत त्याच्या खोलीच्या दिशेने जायला सुरुवात केली. बाजूच्या सगळ्या खोल्यातली माणसं इतकी शांत झोपली होती की कायकुठूनही काहीच आवाज नव्हता. पण आता त्याला कुठलाच घाबरावणारा विचार डोक्यात आणायचा नव्हता. आपल्या खोलीत जाऊन सरळ बेडवर पांघरुणात शिरून झोपून जायचं त्याने ठरवलं. शेवटून दुसरी खोली. त्याने मोबाईलच्या प्रकाशात दरवाजावरचा नंबर वाचून खात्री करून घेतली. किल्ली लावून दार उघडलं आणि लगेच आत जाऊन ते बंदही करून घेतलं.

 

समोरची खिडकी बंद होती. म्हणजे असावी कारण समोर सगळाच अंधार दिसत होता. पण आपण खाली गेलो तेव्हा ती बंदच होती की उघडी होती, त्याला नीट आठवेचना. शेवटी त्याने तो नाद सोडला आणि पलंगावर पडून डोक्यावरून पांघरूण घेऊन पडून राहिला. दिवसभर तो इतक्या वेगवेगळ्या अनुभवातून गेला होता की तो सगळा शीण आता पलंगावर पडल्यावर त्याला जाणवला. पुढच्या दोन मिनिटात त्याला झोपही लागली. पण नंतर लगेच कसल्यातरी आवाजाने त्याला जाग आली. त्याकडे दुर्लक्ष करून तो पडून राहिला. पण नंतर पुन्हा तसलाच आवाज आला. आता त्याच्या हळूहळू लक्षात आलं. हलक्या आवाजात कुणीतरी त्याला हाक मारत होतं. त्याने पांघरूण बाजूला करून आजूबाजूला बघायचा प्रयत्न केला. सगळीकडे अंधार होता पण समोरच्या लाकडी कपाटाच्या खाली थोडा अंधुक उजेड असल्यासारखा वाटलं. त्याने पांघरूण बाजूला सारलं आणि तो त्या कपाटाच्या दिशेने निघाला. कपाटात त्याने तसं काहीच सामान ठेवलं नव्हतं. त्याचं सगळं सामान तर बाहेरच पसरलेलं होतं. कपाटातून उजेड यावा, असं आत होतं तरी काय?

 

सि….द्ध…..….…..…..”पुन्हा दबका आवाज आला.

 

त्याने दचकून आजूबाजूला बघितलं. आवाज नक्की कुठून आला होता? कपाटातूनच तर नसेल? तो धीर करून कपाटाचं दार उघडण्यासाठी पुढे आला.

 

उठाये जा उनके सितम, और जिये जा ……यूही मुस्कुराये जा, आंसू पीए जा…..”

 

बारीकसा गाणं गुणगुणण्याचा आवाज…..बहुतेक कपाटातूनच येत होता ….त्याने एक आवंढा गिळला. आणि सगळा धीर एकवटून कपाटाचं दार उघडलं. समोर कपाटात तीउभी होती. केस चेहऱ्यावर सोडलेले, तरीही त्याच्या आतून रोखलेले डोळे स्पष्ट जाणवत होते….मागोमाग तीचं हलकंच पण भेसूर हसू….

 

धाडकन पुन्हा कपाटाचा दरवाजा बंद करत धडपडत सिद्धार्थ खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्याकडे जायला निघालापण वाटेत कशालातरी अडखळून पडला….”इथे कशाला आलो मी….इथे यायलाच नको होतं…..सायली म्हणत होती मला जाऊ नकोस पण मी ऐकलं नाही…” त्याच्या मनातले विचार जवळजवळ बाहेर ऐकू येत होते त्याला….मागे कपाटाचं दार उघडल्याचा आवाज आला आणि तो जागच्या जागीच गारठला……

————————————————————

————————————————————

काय ? सुजय साने ? काय मस्करी करतोयस का माझी ……की काही गेम खेळायचा विचार आहेबरं चल..तू सुजय साने आणि मी गौरव दीक्षित …” गौरवकडे हातावर टाळी मागण्यासाठी सु.सा. ने हात पुढे केला.

 

मी मस्करी करत नाहीये सुजय मी सुद्धा सुजय साने आहेहे बघ …” त्याने खिशातून स्वतःचं ड्रायव्हिंग लायसेन्स काढलं.

ते बघून सु.सा. चक्रावूनच गेला. सुजय र. साने असं नाव होतं त्या लायसेन्स वर.

हे…..ह्याचा अर्थ काय आहे? तुझं आणि माझं नाव एकच आहे? पण मग….तू खोटं का बोललास? गौरव दीक्षित असं नाव का सांगितलंस ?”

 

तेच सांगायला आलोय खरं तर मी सुजय. प्लिज तू वैतागू नकोस. मी तुला माझ्याबद्दल तेव्हा काहीच सांगितलं नव्हतं. पण ते सुद्धा सांगायचंय. आय होप तू समजून घेशील मला……”

 

अरे पण काहीही असलं तरी खोटी ओळख सांगण्याची काय गरज होती?” सु.सा. आता थोडा वैतागलाच.

 

दुसरा पर्याय नव्हता सुजय. खरंच. तू प्लिज ऐकून घे ना माझं. …आणि प्लिज कोणताही गैरसमज किंवा राग मनात ठेवून ऐकू नकोस….एका मित्राची गोष्ट म्हणून ऐक….”

 

ठीक आहे. सांग…”

एक मोठा पॉझ घेऊन मग गौरव (सुजय) म्हणाला,

माझ्या आयुष्याची काळी बाजू आहे ही असं म्हटलंस तरी चालेल. मी हे आत्तापर्यंत कुणालाच सांगितलेलं नाही. पण आज तुला सांगतोय….तुझ्या मदतीची खूप गरज आहे म्हणूनच नाही फक्त, पण थोड्याश्या दिवसांच्या ओळखीवरही खूप जवळचा मित्र वाटायला लागलायस तू मला, आपल्यात फक्त नावच नाही तर आणखीसुद्धा बऱ्याच गोष्टी सारख्या आहेत असं वाटतं मला….म्हणून सांगतोय…..

**************************************

मी मूळचा पुण्याजवळच्या एका गावातला. लहानपणापासून मित्रांच्या गोतावळ्यात राहिलेला. घरी फक्त आईच. काकाकाकू पुण्यात राहतात. भावंडं नसल्यामुळे असेल पण मला मित्र खूप आहेत…..म्हणजे होते ….. आणि मग त्यामुळे ग्रुपबरोबर सारखे काही ना काही प्लॅन्स आखणं चालू असतं….असायचं…, कुठे मित्रमंडळाचा गणेशोत्सव करा, क्रिकेट च्या मॅचेस खेळा नाहीतर कुठे ट्रिपला जा वगैरे….असंच दीडेक वर्षांपूर्वी मध्य प्रदेशात गेलो होतो आम्ही ट्रिपला…..म्हणजे काय झालं की आमच्या ग्रुपमधल्या एका मित्राच्या बहिणीचं लग्न ठरलं होतं. तो मुलगा जबलपूरचा होता आणि म्हणून लग्नपण जबलपूरला ठरलं होतं. मग सगळेच तिकडे जाणार होतो तर त्यामुळे ही एक मोठी ट्रिपच प्लॅन झाली. जवळपास तीन आठवड्याची. आधी इंदौर मग तिथून दोन दिवस लग्नासाठी जबलपूर, आणि मग नुसती धमाल ….सगळं मध्य प्रदेश पालथं घालायचं, खूप भटकायचं, खायचं आणि शेवटचे दोनतीन दिवस ट्रेक करून मग पुन्हा बॅक टू पुणे. असं सगळं ठरलेलं होतं आमचं. …..

 

मी जे सांगणार आहे, त्याची सुरुवात आम्ही इंदौरला असताना झाली. इंदौरला आम्ही गेलो कारण आमची ट्रेन मुंबई टू इंदौर अशी होती. त्यामुळे मग पहिले दोन दिवस इंदौर फिरून घ्यायचं आणि मग जबलपूरला लग्नासाठी जायचं असं ठरवलेलं होतं. तर दुसरा दिवस. सकाळपासून साईट सिईंग करत फिरायचं आणि मग रात्री इंदौरच्या फेमस सराफा बझार मध्ये जाऊन वेगवेगळ्या डिशेसवर ताव मारायचा असा प्लॅन होता. तर रात्री ९.३० च्या सुमाराला आम्ही तिथे गेलो. एकदोन डिशेस खाऊन मग पुढे आल्यावर पुढे एक एक जण वेगळ्या वेगळ्या स्टॉल्स वर गेला. मी होतो त्या स्टॉलवर खूपच गर्दी होती. माझ्या बाजूला आणखी दोन मुली होत्या त्यासुद्धा त्यांचा नंबर यायची वाट बघत होत्या. मग एकदाचा माझा नंबर आला. त्या स्टॉलवर इंदौरमधला सगळ्यात चांगला दहीवडा मिळतो असं म्हणतात. माझ्या हातात प्लेट आली आणि मग जरा गर्दीतून बाजूला होण्याच्या नादात ती प्लेट हिंदकळली. तेवढ्यात जोरात कोणाचातरी धक्का लागला आणि प्लेटमधलं सगळंच त्या दोनपैकी एका मुलीच्या ड्रेसवर पडलं.

 

जिच्या ड्रेसवर पडलं होतं ती मुलगी तर वसकन अंगावरच आली, काही ऐकूनच घ्यायला तयार नव्हती. मी मवाली आहे आणि मुद्दाम मुलींच्या अंगावर सांडवून त्यांची मजा बघतोय वगैरे असलं काहीही म्हणायला लागली. तिच्या बरोबरची मुलगी मात्र जरा शांत होती, तिनेच तिला समजावलं, असले काहीही आरोप करू नकोस वगैरे सांगितलं. गर्दीतल्या कोणाचातरी धक्का लागला म्हणून चुकून तुझ्या अंगावर सांडलं वगैरे सांगितलं तिच्या मैत्रिणीला. त्या दोघी अगदी जवळच्या मैत्रिणी होत्या बहुतेक, किंवा बहिणी ….म्हणजे मला नंतर कळलं पण तेव्हा माहित नव्हतं ना तर मी जे सांगत होतो तेच त्या मुलीनेपण तिच्या मैत्रिणीला सांगितलं. माझं तिने काहीही ऐकून घेतलं नाही पण मैत्रिणीचं मात्र लगेच ऐकलं….त्या दुसऱ्या मुलीने मला सॉरी पण म्हटलं आणि मग त्यांचा नंबर आला होता, त्यांची प्लेट तयार होती तरीपण त्या खायला थांबल्या नाहीतपुढे कुठेतरी निघून गेल्या….मला खरं तर त्या मुलीला थँक्स म्हणायचं होतंती मध्ये पडली नसती तर तिची मैत्रीण मला पोलीस स्टेशनला घेऊन जायला निघाली होती….पण नंतर गर्दीत त्या दोघी कुठेच दिसल्या नाहीत….

 

पण नंतर मात्र दोन दिवसांनी ती मुलगी मला पुन्हा भेटली….जबलपूरच्या लग्नात….आम्ही आदल्या दिवशी जबलपूरला आलो होतो, जिथे लग्न होतं त्याच हॉलच्या खोल्यांमध्ये सगळ्यांची राहायची सोय केली होतीआदल्या दिवशी रात्री ते संगीत वगैरे होतं आणि मग दुसऱ्या दिवशी लग्न….आदल्या दिवशी काही ती दिसली नाही पण मग लग्नाच्या दिवशी सकाळीच दिसली. नवऱ्या मुलाच्या बहिणीची मैत्रीण होती….म्हणजे हे मला नंतर कळलं

 

सकाळी नाश्त्याला आणि चहा घ्यायला गेलो तर तिथे समोरच दिसली एकदम….माझ्याकडे बघून ओळखीचं हसली. तिला थँक्स म्हणायची संधी मिळाली म्हणून मला खूप बरं वाटलं….संधी म्हणजे दोन अर्थांनी एक तर ती अचानकपणे भेटली म्हणून थँक्स म्हणता येणार होतं आणि दुसरं म्हणजे माझ्या मित्रांपैकी कोणीही तेव्हा तिथे नव्हतं. आदल्या रात्री उशिरापर्यंत नाचून सगळे दमून झोपले होतेमलाच काय ती एकट्याला सकाळी लवकर जाग आली होती….तर मित्र असले असते तर तिच्याशी बोलणं शक्यच झालं नसतं…..इकडे आल्या आल्या इथल्या मुलींशी ओळख काढून बोलायला गेला म्हणून तिच्यासमोर मला चिडवलं असतंपण मी एकटाच होतो त्यामुळे तिच्याशी बोलणं शक्य होतं

गुड मॉर्निंग ….” मी तिच्या इथे जात म्हटलं….

 

गुड मॉर्निंग जी …..आप यहा?”

 

हा….अक्चुअली जिसकी शादी है उसके भाई का मै दोस्त हूँ……मतलब लडकी की तरफ से..मतलब हमारा पुरा ग्रुप आया है यहा….बाकी सब लोग सो रहे है …….और आप …..?”

 

आपके स्टाईल मै बताना है तो …..जिसकी शादी है उसकी बहेन की मै दोस्त हूँ…..मतलब लडके की तरफ से…” ती हसत म्हणाली….

 

और अगर आपके स्टाईल मे बोलना हो तो …..?”

 

तो मै बस इतना ही बोल देती की मेरी दोस्त के भाई की शादी है….” बोलताना ती मिस्किलपणे गालातल्या गालात हसतेय की काय असं मला वाटलं.

 

ओहया यु आर राईटमैने थोडा ज्यादा ही कॉम्प्लिकेटेड बोल दिया….” मी लगेच मान्य केलं.

 

आप नाश्तेकी प्लेट पकडकर क्यों खडे है? चाहे तो आप यहा बैठ सकते है ….” तिने समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवत म्हटलं

 

ओके, थँक्स….”

खरं तर मी असं अनोळखी मुलीशी एवढा पटकन गप्पा मारायला जात नाही कधीच. पण तिच्या हसण्यात काहीतरी होतं असं ….ओळखीचं..तिच्याशी पटकन मैत्री होईल असं वाटायला लावणारं

बहोत सारे मेहेमान होते है ना यहाकी शादी मे…..कल से मै देख रहा हू….काफी लोग है….” काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हटलं….

 

बडे लोग है भाई….बडे लोगोकी शादिया ऐसे ही होती है……”

 

हम्म……”

पूर्ण एक मिनिटाचा ब्रेक घेतल्यावर मधेच तिच्या काहीतरी लक्षात आलं

अरे ….आपको सॉरी केहेना था मुझे अक्चुअलीवो कल मेरी फ्रेंडने कुछ ज्यादाही परेशान किया आपको….”

हे ऐकून मला ओशाळल्यासारखंच झालं. खरं तर मलाच तिला थँक्स म्हणायचं होतं पण एवढा वेळ दुसरंच काहीतरी बोलण्यात ते बाजूलाच राहिलं होतं

अरे नही….वो तो आपने कल भी कहा था मुझे….मुझे ही चान्स नही मिला आपको थँक्स केहेनेकाथँक यु सो मच आप कल बीच मे आई इसलिये नही तो आपकी फ्रेंड तो मुझे मुझे जेल भिजवानेके चक्कर मे थी  ….वैसे यहा आई है क्या वो?”

मी घाबरून इकडेतिकडे बघितलं तसं ती पुन्हा मनापासून हसली. काहीतरी होतं तिच्या हसण्यात ….नक्कीच..

नही ….वो नही है….”

आणखी एक मिनिट परत शांततेतच गेलं. तिने मधेच घड्याळाकडे बघितलं आणि मग खाण्याचा स्पीड वाढवला.

अक्चुअली, मेरा नाश्ता हो गया है ….मै चलती हू ….वो मेरी फ्रेंड वेट कर रही होगी उसे रेडी होने मे हेल्प करनी है …..बाय…”

ती इतकी घाईघाईत निघून गेली की मला काही बोलताही नाही आलं. नंतर लग्नात ही परत भेटेल का आणि भेटली तरी सगळ्यांबरोबर असल्यामुळे तिच्याशी बोलता येईल का, असं डोक्यात आलं माझ्या….आणि मग एकदम माझं मलाच नवल वाटलं. तिला परत भेटून तिच्याशी असं काय बोलायचं होतं मला…..? थँक्स म्हणून तर झालं होतं. मग आणखी काय बोलणार होतो? त्या क्षणी मला माहित नव्हतं, पण का, कुणास ठाऊक ती भेटली तर तिच्याशी बऱ्याच गप्पा मारू शकू असं वाटत होतं कुठेतरी….

***************************

म्हणजे इन शॉर्ट, तू प्रेमात पडलास तिच्या बरोबर ना…..” सु.सा. इतका वेळ मन लावून गौरवची (सुजयची) स्टोरी ऐकत होता.

 

मला माहित नाही, खरं तर आत्ता या क्षणापर्यंत माहित नाही….आणि मी नंतर त्याचा विचारही नाही केला. खरं तर तुला हे सगळं सांगण्याच्या निमित्ताने ते सगळं पुन्हा डोळ्यांसमोर येतंय, आणि ट्रस्ट मी ….मला ते नकोयआयुष्यातल्या सगळ्यात नकोशा आठवणी आहेत त्या….पण नकोशा आहेत म्हणूनच कदाचित मनातून जात नाहीतएनीवे तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर प्रेम वगैरे मला माहित नाहीपण त्या क्षणी मला तिच्याबरोबर असणं आवडलं होतं, तिचं दिसणंदिसायलाही छान होती ती, म्हणजे ती जशी राहायची, तिचे केस, हसणं, ड्रेसिंग स्टाईल सगळं असं परफेक्ट होतं. म्हणजे तिच्यासाठी परफेक्ट होतं. तिचं हसणं तर भुरळ पडणारच होतं. ….जाऊदे मिळालं का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर ? मला फार वेळ तिच्याबद्दल असं बोलत बसायचं नाहीये…”

 

हो ….मिळालं…..पण मग नंतर काय झालं? भेटली का ती परत तुला?” सु.सा. आता पुढची स्टोरी ऐकायला आतुर झाला होता.

******************************

भेटली अशी नाही, पण दिवसभर लग्नात कुठे कुठे दिसत राहिली….त्या नवऱ्या मुलाच्या बहिणीबरोबर नाहीतर मुलींच्या एखाद्या घोळक्यात….दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत माझ्या लक्षात आलं होतं, मी एवढ्या गर्दीत तिलाच शोधत होतो, ती नुसती कुठेतरी दिसली तरी छान वाटत होतंपण तिच्याशी बोलण्याचा चान्स काही मिळाला नाही

 

मग त्यांची ती बिदाई वगैरे होईपर्यंत संध्याकाळ उलटून गेली होती. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तिथल्या हॉटेलमध्ये शिफ्ट होणार होतो. काही दिवस जबलपूरमध्ये राहून आजूबाजूची ठिकाणं फिरणार होतो. मग संध्याकाळी मुलाकडचे सगळे निघून गेले, पाहुणे वगैरे सगळे निघून गेले आणि आम्ही मुंबईपुण्याहून गेलेले माझ्या मित्राकडचे जवळचे नातेवाईक आणि आमचा ग्रुप एवढेच तिथे राहिलो…..सगळेजण आपापल्या बॅग्ज भरायला खोलीवर निघून गेले. पण मला फार कंटाळा आला होता. खरं तर कंटाळा यायचं तसं काही कारण नव्हतं. दोन दिवस आम्ही धमाल केली होती. आज रात्रीपण काहीतरी टाईमपास करणारच होतो. पण तरी आतून अस्वस्थ वाटत होतं. ती मुलगी जाताना भेटली पण नाही, हाच विचार होता डोक्यात….

 

खाली रिकाम्या झालेल्या हॉलमध्ये चकरा मारत होतो, शेवटी कंटाळून वर खोलीकडे जायला निघालो आणि समोरून तीनचार मुलींचा एक ग्रुप खाली उतरला. आणि त्यात ती पण होती. सगळ्यांच्या हातात काही ना काही सामान होतं

 

तिला बघून मला इतका आनंद झाला होता, की मी गप्पच बसू नाही शकलो.

अरे आप? अभी तक यहा है? “

तिला कदाचित माझ्या चेहऱ्याकडे बघून माझ्या बदललेल्या हावभावांचा अंदाज आला असावा. माझ्याकडे जरा निरखूनच बघत हसऱ्या आवाजात म्हणाली,

वो अक्चुअली एक गाडी बंद पड गयी ना, तो हम कुछ लोग पीछे रह गयेअभी फोन आया की दुसरी गाडी भेज दी हैतो अब जा रहे है….”

 

अच्छा तो मतलब आप आपके घर नही जायेंगी अब?”

खरं तर ती कुठे जाते ह्याच्याशी माझा काहीच संबंध नव्हता. म्हणजे असायला नको होता, पण बोलणं सुरु ठेवायचं म्हणून मी काहीही विचारत होतो.

नही, मै तो सुबह निकलुंगीवैसे भी रातको बसमे जाना इतना सेफ नही है ना….अब वो नये बहू का स्वागत और बाकी कुछ विधि है ना घरपर, वहा जा रहे है हम….”

 

बसमे? मतलब आप….”

पण एवढ्यात तिला दुसऱ्या मुलीने हाक मारली म्हणून ती मागे वळली. “आती हूम्हणालीआणि मग पुन्हा माझ्याकडे वळून म्हणाली,

ओके जी, बाय …..” पण जाताजाता जणू काही माझ्या मनातलं ओळखल्यासारखं उत्तर दिलं, “मै यहा जबलपूर नही रहती, यहा से कुछ थोडा ही दूर है मेरा शहरअगर आप शहर घुमने केलीये हमारे यहा आते है , तो जरूर मिलेंगे….बाय

सकाळी जशी पटकन निघून गेली होती तशी ती पटकन निघून गेली…..तिच्या मैत्रिणीने तिला हाक मारली होती त्यामुळे मला तिचं नाव कळलं, आणि  तिनेच सांगितल्यामुळे तिच्या गावाचं नाव….

*********************************

मग काय नाव होतं तिचं आणि तिच्या गावाचं?” सु.सा.

 

तेवढं मी तुला नाही सांगितलं तर चालेल? मी नंतर कधीही ती नावं तोंडाने उच्चारलेलीं नाहीत….आणि माझी ईच्छाही नाहीपण तुझा माझ्यावर विश्वास बसणार नसेल तर सांगतो…..”

 

नाही, इट्स ओके….मग नंतर काय झालं?”

पुढचे दोन तास जेवणखाण विसरून सु.सा. त्याच्या मित्राची स्टोरी ऐकण्यात गढून गेला होता….

——————————————————-

———————————————————-

अरे साहब, आप ठीक तो है? अरे सूरज पानी ला जरा जल्दी….”

दुरून कुठूनतरी सिद्धार्थच्या कानावर शब्द पडत होते….मग त्याच्या तोंडावर पाण्याचे थेंब पडल्याचं त्याला जाणवलंआणि मग हळू हळू तो भानावर आला. तो त्या हॉटेलच्या लॉबीतच होता आणि मगाशी टीव्ही बघत बसलेले लोक त्याच्या आजूबाजूला जमले होते..

लाईट्स आ गये क्या ?” सिद्धार्थने विचारलं तसं त्यातला एक जण म्हणाला,

 

अरे साहब, आपने सपना देखा क्या कोई? लाईट्स तो गयी नहीहम लोग टीव्ही देख रहे है ना और आप कुछ पढ रहे थे और सो गये थे पढते पढते….और अचानक कुछ जोरजोरसे बात करने लगेआपको जगाने आये तो आप उठ ही नही रहे थे, इसीलिये पानी मारना पडा…”

हळूहळू सिद्धार्थच्या सगळंच लक्षात आलं. डायरी वाचत असतानाच त्याला झोप लागली आणि मग स्वप्न पडलं. किती भयानक स्वप्न होतं ते…..आणि त्यातलं ते कपाटातून ऐकू आलेलं गाणंतो आवाज अजून त्याच्या डोक्यात घोळत होता, जणू काही प्रत्यक्षात त्याने तो ऐकला होता …..”उठाये जा उनके सीतम ….और जिये जा …….”

 

हे गाणं तर त्याने आत्ताच कुठेतरी ……मग त्याच्या एकदम लक्षात आलं. डायरीत वाचलेलं सगळं एकामागोमाग एक आठवत गेलं……सुजयची आणि त्या मुलीची भेट…. डायरी वाचता वाचता ह्या गाण्याच्या ओळीपर्यंत आपण आलो आणि मग डोळेच मिटायला लागले. मग डायरीतलं पुढचं …? वाचलंच नाही आपण…….

 

त्याने घाईघाईने आजूबाजूला जमलेल्यांचे आभार मानले आणि ते लोक पुन्हा टीव्ही बघायला गेले तसं त्याने पुन्हा डायरीत डोकं घातलं आणि पुढे वाचायला सुरुवात केली….

**************************

पता नही क्यों लेकिन एक मिनिट रुकके उससे बात करनेकी इच्छा हुई……उसकी आंखोमे भी ऐसेही कुछ दिख रहा थाआज दिनभर शादीमे भी पता नही क्यों मुझे लग रहा था की उसका ध्यान मेरेही तरफ था….मैने बात करते करते उसे बोल तो दिया की मे जबलपूर मे नही रहती, कुछ ही दूर कटनी नाम का शहर है वहा रहती हू….

तब अगर मैने ये बात कही नही होती तो?…..शायद ये दर्द कागज पर लिखती नही बैठती आज …

*******************************

म्हणजे ह्या डायरीत लिहिल्याप्रमाणे सुजय इंदौरला असताना ह्या कोमलला भेटला. मग जबलपूरला लग्नात…..पण नंतर मग तो इथे कटनीला आला असेल का? आणि इथे आल्यावर मग पुढे काय झालं असेल नक्की? आत्तापर्यंत वाचलेलं सगळं सिद्धार्थच्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रासारखं तरळून गेलं…..

 

एकदम त्याला काहीतरी आठवलं. पटापट डायरी, मोबाईल सगळं उचलून तो धावत वर खोलीकडे निघाला. खोलीत आल्यावर आधी त्याने समोरच्या टेबलवर ठेवलेला, डायरीबरोबर त्या घरात मिळालेला त्या मुलीचा तो फोटो उचलून नीट बघितला. मागच्या बाजूला काही नाव, पत्ता असलं लिहिलेलं आहे का, ते बघितलं. अर्थात आधी बघितलं होतंच , पण आता पुन्हा बघितलं. त्या कोमलने डायरीमध्ये स्वतःचं वर्णन लिहिलेलं नव्हतं. अर्थात स्वतःचं वर्णन असं कोणीच स्वतःच्या हातांनी लिहून ठेवत नाही म्हणा. पण त्यामुळे हा फोटो त्या कोमलचाच आहे की आणखी कोणाचा हे कळायला मार्ग नव्हता.

 

म्हणजे ह्या डायरीत लिहिल्याप्रमाणे सुजय इंदौरला असताना ह्या कोमलला भेटला. मग जबलपूरला लग्नात…..पण नंतर मग तो इथे कटनीला आला असेल का? आणि इथे आल्यावर मग पुढे काय झालं असेल नक्की? इथे कटनीला ती कोमल कुठे राहत असेल? तिची डायरी त्या प्रजापती निवास मध्ये मिळाली पण तिचं आडनाव तर व्यास आहे. ती नक्की कुठे राहत असेल? तिचा शोध घेतला पाहिजे आता…. आणि…. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आज त्या प्रजापती निवास मध्ये जो फोटो मिळाला आणि नंतर जी मुलगी आपल्याला दिसली तो कोण असेल? ती ही कोमलच असेल की आणखी कुणी? आत्तापर्यंत वाचलेलं सगळं सिद्धार्थच्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रासारखं तरळून गेलं…..त्याचं मन ह्या डायरीमध्ये वाचलेल्या कथेशी आज त्या घरात अनुभवलेल्या गोष्टींचा संबंध शोधू पाहत होतं.

 

आणखी काही वेळ तो तसाच विचार करत बसला होता. डायरीमध्ये आणखी तीन पानं वाचायची राहिली होती पण एक तर हे हिंदीत वाचणंसुद्धा थोडं वेळखाऊच होतं. मराठी किंवा इंग्लिश आपण जसं झरझर वाचून काढतो, तसं नव्हतं हे… आणि आता डोक्यातल्या सगळ्या विचारांमुळे, जागरणामुळे त्याचे डोळे अक्षरशः मिटायला लागले होते…..त्याने तसंच स्वतःला पलंगावर झोकून दिलं आणि पुढच्या दोनच मिनिटात त्याला गाढ झोपही लागली. झोप लागण्यापूर्वी मात्र त्याने पलंगावर पडल्या पडल्याच त्या कपाटाकडे नजर टाकली….आणि मग मग कुठल्याही भीतीने पुन्हा मनात शिरकाव करण्याआधी त्याकडे पाठ करून दुसऱ्या कुशीवर वळून डोक्यावरून पांघरूण घेऊन तो गाढ झोपून गेला

 

क्रमशः

3 Comments Add yours

  1. Vaishali Agre says:

    Ha bhag hi maste zhala. aata phudacha bhag kevha ?

    Like

  2. Apratim Rutusara Madam. Khup Chhan Lihita Tumhi.Utkrushth Lekhan. Story Khup Rangat aali aahe aani suspense ughadnyachya khup javal. rutusara tumhi ashyach chhan chhan story lihit raha.aani pudhcha bhag lavkarat lavkar prakashit kara. aamhi khup aaturteni tumchya post chi vat baghto. Thanks, have a great day…….. god bless you mam to keep writing alwas.

    Like

  3. Kiran Kamble says:

    Khup chhan, next part chi wat bagat ahot, v all hope ki yaveles jast vel lagu naye. Tarihi all the best, asech likhan chalu thewa.

    Like

Leave a comment